शिक्रापूर: प्रतिनिधी शेर खान शेख
जांबूत ता. शिरुर येथे २६ ऑगस्ट रोजी मुक्ताबाई खाडे या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याने या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यांनी आंदोलन केले. दोन दिवसात सदर परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून, नागरिक समाधान व्यक्त करत आहे. अजूनही असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.
जांबूत ता. शिरुर येथे यापूर्वी दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झालेला असताना २६ ऑगस्ट रोजी मुक्ताबाई खाडे हि महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने ग्रामस्थ आक्रमक होऊन ग्रामस्थांनी आंदोलन केले. यावेळी परिसरातील बिबटे चौदा दिवसात जेरबंद करण्यात येणार असल्याचे आणि मयत महिलेच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिले होते. दरम्यान, वनविभागाने परिसरात तब्बल पंधरा पिंजरे लावत बिबट्या पकडण्याची कार्यवाही सुरु केली, तर आज २८ ऑगस्ट रोजी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. दरम्यान, वनपाल गणेश पवार, वनरक्षक लहू केसकर, नारायण राठोड, रेस्क्यू टीमचे ऋषिकेश विधाटे, रोहित येवले, अविनाश सोनवणे, श्रेयस उचाळे, शुभम शिस्तार यांसह आदींनी घटनास्थळाहून बिबट्याला ताब्यात घेत त्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात केली आहे.
तर घटना घडल्यानंतर दोन दिवसात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत असून इतरही बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सदर ठिकाणी चोवीस तास पहारा देत असून एक बिबट्या पकडला असून परिसरातील अन्य बिबटे देखील पकडले जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.