इंदापूर: प्रतिनिधी सचिन आरडे
इंदापूरचे विशेष आकर्षण असलेल्या भरतशेठ शहा मित्र परिवार दहिहंडी महोत्सवाचे आयोजन गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता इंदापूर पोलीस स्टेशन समोरील जुन्या मार्केट कमिटीच्या मैदानावरती करण्यात आले आहे. इंदापूरमधील भरत शहा यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणारा हा दहिहंडी महोत्सव, सेलीब्रेटींच्या उपस्थितीमध्ये सर्वात जास्त गर्दी होणारा दहिहंडी महोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. या दहीहंडी उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. या दहिहंडी महोत्सवात विजेत्या संघाला ५१ हजार रूपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
या दहिहंडी महोत्सवासाठी राज्यभरातून येणारे गोविंदा पथक यासाठी हा दहिहंडी महोत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांच्या भारदार नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर २ रशियन डान्सरचाही नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये प्रत्येक सहभागी गोविंदा पथकास ११००० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
प्रमुख उपस्थितीमध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, पुरंदरचे आमदार संजय जगताप, अकलूज ग्रामपंचायतचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील हे उपस्थित राहणार आहेत. इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी या दहिहंडीला उपस्थित राहून, गोपालांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजक भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.