भोरः भाग २
राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने विविध पक्षांची उमेदवारांसर्भात चाचपणी सुरु झाली असल्याचे पाहिला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर विधान क्षेत्रामध्ये भोर, वेल्हा (राजगड), मुळशी या तीन तालुक्यांची मिळून भोर विधानसभा होते. या विधानसभा क्षेत्राचा जितका विकास होणे आवश्यक होते, तितका न झाल्याने तालुक्याची दुर्दशा व आर्थिक मागासलेपण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. निवडणूक तोंडावर आली की, येथील रखडलेल्या प्रश्नांबाबात सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही जाग येते. मात्र, प्रश्नांची सोडवणूक होत नाही, हे मोठे दुर्देव आहे. भोर विधान सभा क्षेत्रामध्ये निष्क्रेय विरोधक यांच्यामुळे सत्ताधाऱ्यांचे कायम वर्चस्व राहिलेले आहे.
भोर तालुक्यातील गेल्या ३२ वर्षांपासून औद्योगिक वसाहत (MIDC) चा प्रश्न धूळ खात पडून आहे. इथल्या स्थानिक तरुणाला रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने त्याला इतरत्र भटकंती करीत नोकरी शोधण्याची वेळ आली आहे. कित्येक वर्षांपासून कोणताही नवीन प्रकल्प कारखाना येथे येऊ शकलेला नाही. इथल्या पर्यटनाला विकास व चालना मिळालेली नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते या भागात पाहिला मिळतात. रस्ते उखडले की, त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, उत्तम दर्जाची कामे न केल्याने पुन्हा रस्ता उखडतोच. त्यावर पुन्हा मलमपट्टी केली जाते. असा हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष सुरुच आहे. त्यावर सत्ताधारी ना विरोधक, यांनी प्रश्न लावून धरून त्याची सोडवणूक न केल्याने तालुका दुर्लक्षित समजला जात आहे.
भोर तालुक्यात नियोजन शून्य कारभार सत्ताधाऱ्यांकडून हाकला जात असून, दुरदृष्टी नसल्याने व इच्छाशक्ती नसल्याने जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरु आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणारे पुढारी जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतः ची तुंबडी भरून काढण्यासाठी व्यस्त असल्याने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पिचलेल्या जनतेच्या हितासाठी व जिवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. महायुती सरकारच्या सर्व शासकीय योजनांचा शासकीय कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बोलावून शासकीय अधिकारी करीत असून, ही नेते मंडळी त्याचा सोशल मीडियावर प्रचार करीत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे एकप्रकारचे विकास कामांच्या अनुषंगाने श्रेयवाद घेण्याचा घाट घातला जात असल्याचे देखील दपक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
भोर विधानसभा क्षेत्रात निष्क्रिय विरोधक यांच्यामुळे सत्ताधाऱ्यांचे कायम वर्चस्व या विधानसभेवर राहिलेले आहे. विरोधकांकडून विरोध केला जातो, पण तो निवडणुकीपुरताच. निवडणूक संपली की, प्रश्न संपले असे म्हणत सर्वत्र शांतता पसरते. विरोधकांमध्ये एकी नसल्याने त्याचा खूप मोठा फायदा सत्ताधाऱ्यांना होताना दिसतो. ही गोष्ट विरोधकांच्या लक्षात आली, तर सत्ताधाऱ्यांना सत्तेवरुन पायउतार व्हायला वेळ लागणार नाही. आता घोडेमैदान दूर नाही. भोरमध्ये विरोधी बाकावरील सत्तेवर येतील की सत्ताधारी पुन्हा सत्ता आपल्या नावावर करतील, हे आता भोरवासियांच्या हातात आहे.
क्रमश…..