पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
हवामान विभागाने दिलेल्या इशारऱ्यानंतर राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, पुणे शहरात देखील मुसळधारा कोसळत आहेत. यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्यामुळे बाबा भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्त्यासह शहरातील मध्यवर्ती भागांत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
खरंतर पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी नवीन नाही. मात्र, पावसाळा सुरू झाला की वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात पाहायला मिळते. रस्ते वाहतूक कोंडीने तुंबून जातात. त्यातच पुण्यात कालपासून पुण्याला पावसाने झोडपल्यामुळे महापालिका प्रशासनाने सावधान पावले उचलत भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. यामुळे शहरातील नारायण पेठ, टिळक पूल, महापालिका परिसर, शनिवारवाडा परिसर, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. नागरिक दिसेल तसे आडव्या तिडवी वाहने हाकत असल्याने कोंडीत आणखी भर पडत असल्याचे चित्र आहे.