बारामतीः वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांनी मिळून केलेल्या धडाकेबाज कारवाईमध्ये जबरी चोरी व इलेक्ट्रीक मोटार चोरीतील सराईत दोन गुन्हेगारांचा शोध लावण्यात त्यांना यश आले असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच गुन्ह्यातील दोन लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईमध्ये हस्तगत केला आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हददीतील मोढवे ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीतून उंबरवाडा बालगुडेवस्ती येथे दि. ११/०७/२०२४ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेला पत्ता विचारण्याचा बहाना करुन त्यांच्या डोक्यावर चाकूने वार करीत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये त्या ठिकाणी मदतीसाठी धावून आलेल्या आणखी एका महिलेवर देखील आरोपीने मारहाण करीत तिथून पळ काढला होता. या प्रकरणी वडगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या घटनेतील आरोपीच्या मागावर होते. अखेर गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे संशईत आरोपी विनोद मारूती नामदास (रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे), रोहीत विनायक जाधव (रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे) यांना पोलिसांंनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्ह्याच्या ठिकाणावरून तीन ग्रॅम वजनाचे सोन्याच्या मन्यांची चोरी केल्याचे कबुली पोलीसांना दिली.
पोलीसी खाक्या मिळताच, आणखी तीन गुन्ह्यांची झाली उकल
या प्रकरणातील आरोपी रोहीत विनायक जाधव याने मोढवे गावच्या हद्दीत २०२२ मध्ये देखील चोरी तसेच वडगाव निंबाळकर गावच्या हद्दीत निरा डावा कॅनॉलवर इलेक्ट्रीक मोटारची चोरी केल्याचे कबुली पोलसांना दिली आहे. यावरुन पोलिसांनी सदर गुन्ह्यातील विनोद मारूती नामदास (रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे), रोहीत विनायक जाधव (रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे) यांना अटक केली असून, आरोपींकडून जबरी चोरी व इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या प्रकरणातील तीन गुन्हे उघड झाले आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर या आधी देखील विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, सुदर्शन राठोड उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संकपाळ स्थानिक गुन्हे शाखा, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पांडुरंग कन्हेरे, पोलीस हवालदार रमेश नागटीळक, महेश पन्हाळे, सागर देशमाने, अमोल भोसले, अनिल खेडकर, भाउसो मारकड, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, बाळासाहेब कारंडे, स्वप्नील अहिवळे, पवार, अभिजीत एकशिंगे यांनी केलेली आहे. पुढील तपास पोलीस पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.