पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
बदलापूरमध्ये घटलेल्या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी मंगळवारी तब्बल १० तास रेलरोको केला. आरोपीला फाशीचीचं शिक्षा द्या, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची होती. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली असून, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून लाठीचार्ज करून आंदोलकांना रेल्वे स्थानकातून हटवण्यात आले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे.
बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणे गुन्हा असेल, तर तो मला मान्य आहे. मला सरकारने फाशीची शिक्षा द्यावी, पण आम्ही बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबाच्या बाजूने उभे राहणार. आम्ही आंदोलनं करणार. जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला व नागरिक सुरक्षित नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावे किंवा फाशी द्यावी’, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांना दिली.
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी आज सकाळी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांना दिलेली सुरक्षा काढून घेण्याची विनंती सरकारला केली आहे. त्यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता, त्यावर सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली. ‘तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना सुरक्षा दिली आहे. मी ऐकलं की आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, अगदी त्या आसामला गेलेल्या सगळ्यांनाही सुरक्षा दिली आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षेची खरंच गरज नाही. मीही तुमच्यासारखीच या राज्याची नागरिक आहे. जेवढी माझी सुरक्षा महत्त्वाची तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक नागरिक व महिलेची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे माझी सुरक्षा काढून घ्यावी आणि ती राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी’, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.