बारामती: येथील एका हॅाटेल व्यावसायिकाचे तीन खाजगी सावकारांनी अपहरण करुन त्याच्याकडून ४० टक्के व्याजाने रक्कम वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ मार्च ते २० मे रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बारामती येथील हरीकृपानगर भागात घडली आहे, अशी माहिती बारामती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली. सागर गवळी (रा. माळावरची देवी बारामती), विकास माने (रा. माळेगाव), विक्रम थोरात (एमआयडीसी जळोची रोड बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन खाजगी सावकारांची नावे आहेत. या प्रकरणी व्यावसायिकाच्या पत्नी स्वाती सुरेश ननवरे यांनी दि. १९ अॅागस्टला बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
व्याज देत नाही म्हणून अपहरण
हॅाटेल व्यावसायिक सुरेश ननवरे यांनी २२ मार्च ते २० मे या काळात खाजगी सावकार सागर गवळी, विकास माने, विक्रम थोरात यांच्याकडून ५० हजार व्याजाने घेतले होते. त्याच्याबदल्यात ननवरे यांनी ३० हजार रुपये व्याज देऊनही व्याजापोटी २ लाख २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून जबरदस्तीने त्यांची स्कॅारपीओ कार हे खाजगी सावकार घेऊन गेले. सुरेश ननवरे हे व्याज देत नाही म्हणून आरोपींनी मंगळवारी त्यांचे अपहरण करुन तांदूळवाडी म्हसोबा येथील ओढ्यात त्यांना डांबून ठेवल्या प्रकरणी तिघांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे करीत आहेत.