ठाणे: येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात गतीमंद मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकास समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रदीप शेळके (वय ४२) याला अटक केली आहे. पीडित मुलीचे नातेवाईक आणि रुग्णालयातील एमएसएफ सुरक्षा रक्षकांमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
सुरक्षारक्षकांकडून चोप
या घटनेतील ११ वर्षीय पीडित मुलगी आपल्या आईसोबत कळवा रुग्णालयात आली होती. त्यावेळी ती रुग्णालयाच्या आवारात उभी होती. नराधम प्रदीप याने या मुलीला जवळच असलेल्या उद्यानात नेत तिच्यासोबत अश्लील कृत्य करीत होता. हे मुलीच्या नातेवाईकांनी पाहिले. त्याचवेळी रुग्णालयाच्या परिसरात डॅाक्टरांचा संप सुरु होता. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या नातेवाईकांनी डॅाक्टरांना दिली. डॅाक्टरांनी लागलीच रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांना बोलावून आरोपीला चांगलाच चोप दिला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. या नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.