दत्तात्रय कोंडे | उपसंपादक
खेडशिवापूर : स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त खेडशिवापूर येथे समस्त ग्रामस्थ मित्र मंडळाच्या वतीने गावातील माजी सैनिकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. देशसेवेसाठी आयुष्यातील बहुमोल काळ समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सिमित शिवाजी कोंडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले, तर मा. दिनाभाऊ कोंडे आणि मा. रमेश बाप्पू कोंडे सुविचार मंच यांचे सौजन्य लाभले. माजी सैनिकांचा सन्मान होत असल्याने कार्यक्रमस्थळी देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी सैनिकांनी देशाच्या सीमेवर बजावलेल्या कर्तव्याचे स्मरण करून त्यांच्या त्याग व योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानामुळेच देशातील नागरिक सुरक्षितपणे स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला खेडशिवापूरमधील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकोप्याची भावना अधिक दृढ झाली. माजी सैनिकांचा सन्मान हा केवळ व्यक्तीचा गौरव नसून देशासाठी सेवा बजावलेल्या प्रत्येक सैनिकाच्या त्यागाचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
भावी पिढीने माजी सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि देशसेवेतून प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेची भावना मनात रुजवावी, असा संदेश या सत्कार समारंभातून देण्यात आला.










