भोर : भोर तालुक्यातील राजकारणात आज मोठा उलटफेर पाहायला मिळाला. भोर पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत सत्ता काबीज केली आहे. संख्याबळ समान असल्याने अखेर ‘ईश्वरी चिठ्ठी’ काढण्याची वेळ आली आणि त्यामध्ये राष्ट्रवादीच्या मनिषा कंक यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित झाले. तर विशाल कोंडे यांची उपसभापतीपदी निवड झाली. या निकालामुळे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
भोर पंचायत समितीचे सभापतीपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव असल्याने निवडणुकीत चार महिला उमेदवार रिंगणात होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तृप्ती खुटवड आणि मनिषा कंक तर भाजपकडून गीता आंबवले आणि सुषमा चव्हाण या उमेदवारांनी दावेदारी केली होती. पंचायत समितीमध्ये एकूण आठ गण असून दोन्ही पक्षांचे चार-चार सदस्य असल्याने संख्याबळ पूर्णपणे समसमान झाले होते.
यामुळे मतदानानंतर निकाल लागणे अशक्य झाले आणि अखेर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्याचा पर्याय स्वीकारावा लागला. या चिठ्ठीत राष्ट्रवादीच्या मनिषा कंक यांचे नाव निघाले आणि सभापतीपदावर त्यांची निवड निश्चित झाली. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले, तर भाजप आणि संग्राम थोपटे समर्थकांमध्ये निराशा पसरली.
या निकालामुळे माजी आमदार संग्राम थोपटे यांना सलग तिसरा राजकीय धक्का बसल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतर झालेल्या भोर नगरपालिका निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्या निवडणुकीत आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपद पटकावले होते.
आता पंचायत समितीचे सभापतीपदही राष्ट्रवादीच्या गळ्यात पडल्याने भोर तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे दिसत आहे. थोपटे यांचे राजकीय वर्चस्व कमकुवत होत असल्याची चर्चा सुरू झाली असून, दुसरीकडे आमदार शंकर मांडेकर यांचे राजकीय वजन वाढत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
भोर तालुक्यात सत्ता टिकवण्यात अपयशी ठरलेल्या थोपटे यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या राजकीय रणनीतीवरही टीकेची झोड उठत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या विजयामुळे तालुक्यातील सत्ता अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.















