भोर : तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात संभाव्य युतीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. या चर्चेनुसार शिवसेनेला एक जिल्हा परिषद जागा आणि एक पंचायत समितीची जागा देण्यावर सहमती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपकडे तीन जिल्हा परिषद सदस्य जागा आणि सात पंचायत समिती जागा राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत परस्परविरोधात लढलेले दोन उमेदवार आता एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ज्या नेत्यांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप झाले होते, तेच नेते आता “विकासासाठी एकत्र” असा दावा करत हातात हात घालून मैदानात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भोर तालुका हा विकासाच्या दृष्टीने कायमच चर्चेत राहिला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि शेतीशी संबंधित प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युती झाल्यास स्थिर नेतृत्व आणि समन्वयातून विकासाला गती मिळेल, असा दावा युती समर्थकांकडून केला जात आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत सत्ता असेल तर निधी आणणे आणि कामे मार्गी लावणे सोपे जाते,” असे मत काही भाजप नेत्यांनी व्यक्त केले आहे.
मात्र दुसरीकडे, ही युती केवळ विकासासाठी आहे की राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत. “जनतेने विधानसभा निवडणुकीत दिलेला कौल विसरून केवळ सत्तेसाठी एकत्र येणे योग्य आहे का?” असा प्रश्न राष्ट्रवादी व काँग्रेसकडून विचारला जात आहे. शिवाय तळागाळातील कार्यकर्त्यांची नाराजीही युतीसमोर आव्हान ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सध्या तरी या युतीबाबत दोन्ही पक्षांच्या अधिकृत नेत्यांकडून स्पष्ट घोषणा झालेली नाही. मात्र अंतर्गत बैठकांचा सिलसिला सुरू असल्याचे समजते. येत्या काही तासांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, भोर तालुक्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल, यात शंका नाही.














