खेड शिवापूर: विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवकाचा पूर्ववैमनस्यातून मधुमोहजालात (हनीट्रॅप) अडकवून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर आरोपींनी युवकाचा मृतदेह खेड शिवापूर परिसरात डोंगरात पुरल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.
न्यायालयाने अटक केलेल्या दोघांना ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेप्रकरणी एका युवतीसह एकूण अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित १७ वर्षीय युवक गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होता. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, पोलिस तपासात युवकाचा काही महिन्यांपूर्वी आरोपींसोबत वाद झाल्याचे समोर आले. त्या वादातून युवकाने एकावर हल्ला केला होता. याच घटनेचा सूड उगवण्यासाठी आरोपींनी कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी परिचयातील एका युवतीला समाज माध्यमावर बनावट खाते उघडण्यास सांगून युवकाशी मैत्री वाढवण्यास लावले. युवतीने युवकाचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींच्या सांगण्यावरून २९ डिसेंबर रोजी त्याला खेड शिवापूर परिसरात भेटण्यासाठी बोलावले. ठरलेल्या ठिकाणी आरोपी आधीच दबा धरून बसले होते. युवक तेथे पोहोचताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपींनी त्याला बेदम मारहाण करत तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खेड शिवापूर परिसरातील डोंगरात पुरल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. युवकाचा शोध न लागल्याने नातेवाइकांनी पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला. संशयावरून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असता, चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर या प्रकरणातील दोन आरोपींना कर्नाटकातून अटक करण्यात आली.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, तुषार किंद्रे, अमोल काटकर, योगेश झेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींनी मृतदेह पुरल्याची जागा दाखवण्याचे कबूल केले असून, नेमकी जागा शोधण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली असून, हनीट्रॅपद्वारे घडलेल्या या खुनाने गंभीर सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणला आहे.














