शिरवळ (ता. खंडाळा) : पळशी येथे झालेल्या अमानवी मारहाणीच्या घटनेत एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण शिरवळ परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आतिश अशोक राऊत (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये समूहाने खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पळशी येथील तेजस भरगुडे व दीपक भरगुडे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
ही घटना शनिवारी (ता. २७) रात्री पळशी गावात घडली. याबाबत मृत तरुणाचे वडील अशोक राऊत यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आतिश शनिवारी रात्री पळशी येथे गेला असता तेजस भरगुडे, दीपक भरगुडे व त्यांच्या साथीदारांनी त्याच्यावर कोणत्याही कारणाशिवाय जबर मारहाण केली. मारहाणीनंतर आतिश गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याची माहिती पळशी येथील पाहुणे श्री. दगडे यांनी राऊत कुटुंबीयांना दिली.
कुटुंबीयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आतिशला जवळच्या दवाखान्यात दाखल केले. त्याच्या डोळ्याखाली, चेहऱ्यावर तसेच पाठीवर गंभीर जखमा होत्या. उपचारादरम्यान ‘तुला कोणी मारहाण केली?’ असे विचारले असता आतिशने तेजस भरगुडे, दीपक भरगुडे व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचे सांगितले. प्रकृती अधिक खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी सातारा व नंतर पुणे येथे हलविण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर शिरवळमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. समस्त माळी समाज व शिरवळ ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी ‘शिरवळ बंद’ची हाक देण्यात आली होती. त्यानुसार गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींवर कठोर कारवाई करावी व घटनेचा सखोल तपास करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली.
आतिश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून तो वडगाव येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होता. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फलटणचे पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपअधीक्षक विशाल खांबे व पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के करीत आहेत.














