भोर : नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या एकहाती सत्तेला मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाने २० पैकी १६ जागांवर विजय मिळवत नगरपरिषदेत संख्याबळ सिद्ध केले असले, तरी नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे गेल्याने भाजपची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. त्यामुळे भोरच्या राजकारणात सत्तासमीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रभाग क्रमांक २ मध्ये आशू ढवळे आणि जयश्री शिंदे यांना समान मते मिळाल्याने निकालासाठी चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष जयश्री शिंदे यांच्या नशिबी विजय आला. भाजपचे अमित सागळे यांनी ४२६ मतांचे सर्वाधिक मताधिक्य मिळवत निवडणूक जिंकली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा मळेकर यांनी केवळ २० मतांच्या फरकाने विजय मिळवला. एकूणच मताधिक्य पाहता बहुतांश निकाल निसटते ठरले.
मतमोजणीच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने दोन प्रभागांत आघाडी घेतली होती, तर प्रभाग क्रमांक ३ आणि १० मध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. नगराध्यक्षपदाच्या पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार संजय जगताप यांनी २४५ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार रामचंद्र आवारे यांनी सहा प्रभागांत निर्णायक आघाडी घेत अखेर १७० मतांनी विजय नोंदवला.
विशेष बाब म्हणजे नगराध्यक्षपदाचे दोन्ही प्रमुख उमेदवार आपापल्या प्रभागात आघाडी घेऊ शकले नाहीत. स्थानिक राजकारणात प्रभाव असलेल्या भेलके–पाटील गटाचे दोन नगरसेवक प्रथमच नगरपरिषदेत निवडून आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांनी मोठी ताकद लावत प्रचार केला होता.
एकीकडे भाजपकडे संख्याबळ असले, तरी नगराध्यक्षपद हातातून गेल्याने संग्राम थोपटे यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान निर्माण झाले आहे. आगामी काळात भोर नगरपरिषदेत सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, स्थानिक राजकारणाचे गणित नव्याने मांडले जाणार आहे.














