भोर – येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भोर शहरात वातावरण चांगलंच तापत आहे. “भोरचा खरंच विकास झाला का?” हा प्रश्न सतत चर्चेत असून यावर्षीची निवडणूक केवळ राजकीय पक्षांची नव्हे तर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत म्हणून पाहिली जात आहे. नागरिकांच्या नाराजीचे स्वर आता उघडपणे ऐकू येत असून बदलाची मागणी अधिक बुलंद होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी प्रचारादरम्यान प्रामुख्याने विकासाच्या मुद्यावर भर दिला आहे. त्यांनी दिलेले उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील असून थेट जनतेशी नाळ जोडलेली असल्याने मतदारांमध्ये नवा विश्वास निर्माण होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अनेक नागरिक असेही सांगतात की “उमेदवार साधे, सर्वसामान्य आणि सर्वांना सहज भेटणारे आहेत, हीच खरी ताकद आहे.”
याउलट, नागरिकांच्या एका मोठ्या घटकाचा आरोप आहे की भाजप जातीय राजकारण पुढे रेटून वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढली जावी ही सर्वसाधारण अपेक्षा असताना जातीय समीकरणांची राजकीय पातळी खालावल्याची टीका सोशल मीडियासह विविध मंचांवर होत आहे. काही नागरिकांचे मत असेही आहे की मागील काळात “एकहाती सत्ता” असल्यामुळे प्रशासनाचा तोल बिघडला आणि परिणामी भोर शहराचा वास्तविक विकास खुंटला.
नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार रामचंद्र आवारे यांचीही जनतेशी असलेली जवळीक चर्चेत आहे. दीर्घकाळ केलेल्या जनसेवा आणि सतत ठेवलेल्या जमिनीवरच्या संपर्कामुळे आवारें यांचे नाव निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच लोकाभिमुख पर्याय म्हणून पुढे आले होते. नागरिकांच्या मते “विकासाला दिशा देणारा आणि सर्वांना जोडणारा चेहरा” म्हणून आवारे यांच्याकडे पाहिले जात आहे.
सध्या परिस्थिती पाहता “बदल निश्चित” असल्याचे नागरिक ठामपणे बोलू लागले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीने विकासाचा रोडमॅप आणि नागरिकांच्या गरजांनुसार प्राधान्यक्रम निश्चित केल्याने निवडणुकीतील वातावरण आणखी गतिमान झाले आहे.
आता मतपेट्या निर्णय देईपर्यंत तणाव कायम राहणार असला तरी एक गोष्ट स्पष्ट — या निवडणुकीत विकास, सर्वसमावेशक नेतृत्व आणि जनतेच्या प्रश्नांचा स्वीकार यालाच मतदार प्राधान्य देत आहेत.
भोर शहराचा निकाल केवळ सत्ता कोणाच्या हातात येईल हेच सांगणार नाही, तर — पुढील पाच वर्षांचा विकासमार्ग ठरवणार आहे.














