भोर : नगरपरिषद निवडणुकीचा ताप वाढत असताना प्रचाराची दिशा अधिक धारदार होत आहे. “भोरचे लोकहो तुम्ही ठरवा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत जायचे की उपमुख्यमंत्र्यांसोबत जायचे?” असा थेट सवाल उपस्थित करत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली. वाघजाई मंदिरात त्यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला. या वेळी बोलताना पाटील म्हणाले, “भोरमध्ये सध्या अजित पवारांची सत्ता असली तरी राज्यात ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भोरची जनता आता ठरवणार — अजित पवारांसोबत राहायचे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वासोबत पुढे जायचे.”
प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे, शेखर वढणे, राजेंद्र शिळीमकर, स्वरूपा थोपटे, संजय जगताप, पृथ्वीराज थोपटे, सचिन हर्णसकर, पल्लवी फडणीस, शैलेश सोनवणे, रवींद्र कंक, गणेश पवार, अभिषेक येलगुडे, जीवन कोंडे, दीपाली शेटे, स्वाती गांधी, राजेंद्र गुरव, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, सादिक फरास व सचिन मांडके यांचा समावेश होता.
औद्योगिक वाढ आणि रोजगार निर्मिती हा भोर तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगत पाटील म्हणाले, “भोर औद्योगिक वसाहत उभी राहण्यासाठी आम्ही प्राधान्याने प्रयत्न करू. विशेषतः महिलांना रोजगार मिळावा यासाठी स्वतंत्र धोरणात्मक पाठबळ देऊ.” देशभरातील विकासाची गती आणि मोदींच्या नेतृत्वाबद्दल बोलताना त्यांनी NDA ला बिहारमध्ये मिळालेल्या बहुमताचा आणि महाराष्ट्रातील महायुती सरकार स्थापनेचा उल्लेख केला. “मोदीजींच्या योजनांनी सर्वसामान्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवला आहे. या योजनांचा थेट लाभ भोरमधील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नगरपरिषदेत भाजपाचे सरकार असणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे यांनीही आत्मविश्वासपूर्ण भाषण करत म्हटले, “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, मोदींच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊनच आम्ही भाजपात प्रवेश केला. मागील निवडणुकीत १८ जागा जिंकल्या; यंदा वाघजाईची कृपा असल्याने २१ शून्य अशी विजयी कामगिरी नक्की होईल.”
पारंपरिक श्रद्धा, उत्साह आणि राजकीय जोश यांचा मिलाफ असलेल्या या प्रचाराच्या शुभारंभामुळे भोर नगरपरिषद निवडणुकीची लढत आणखी तापणार, हे निश्चित.


















