भोर (प्रतिनिधी) –पूर्व भोर भागातील जनसेवा, विकास आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे उदय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे भोंगवली पंचायत समिती गणातून आगामी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नागरिकांकडून आणि तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद उमटताना दिसत आहे.
उदय शिंदे हे आमदार शंकरदादा मांडेकरांचे निष्ठावान सहकारी म्हणून ओळखले जातात. मागील काही वर्षांपासून त्यांनी पूर्व भागात विविध सामाजिक उपक्रम, विकासकामांचे पाठपुरावे, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेत भक्कम विश्वास निर्माण केला आहे. स्थानिक प्रश्नांवर वेळोवेळी प्रशासन दरबारी पाठपुरावा करून उपाययोजना मिळवून देण्यात त्यांची सक्रिय भूमिका राहिली आहे. त्यामुळे जनतेत त्यांच्या नावाला विश्वासाची शिक्कामोर्तब मिळत आहे.
भोंगवली – कामथडी परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, महिला बचतगटांचे प्रश्न, शैक्षणिक सुविधा आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी यावर शिंदे यांनी सातत्याने लढा दिल्याने युवकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा उत्साह दिसत आहे. अनेक युवकांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आगामी निवडणुकीत त्यांना पाठिंबा जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्येही भोंगवली गणातील निवडणूक बळकट करण्यासाठी सक्षम आणि जनतेशी थेट संपर्क असलेला चेहरा पुढे यावा, अशी इच्छा व्यक्त होत होती. उदय शिंदे यांच्या इच्छुकतेमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “उदय शिंदे हे जमिनीवर उतरून काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही गावात समस्या असल्यास ते स्वतः उपस्थित राहून ती सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पंचायत समितीत ते आले तर विकासाला गती मिळेल.”
आगामी काही दिवसांत पक्षस्तरावर चर्चा व निर्णयप्रक्रिया वेग घेणार असली तरी जनतेचा आणि तरुणांचा मिळणारा प्रतिसाद पाहता उदय शिंदे यांच्या उमेदवारीची शक्यता अधिक बळावली आहे.
भोंगवली पंचायत समिती गणातील बदलते राजकीय वातावरण, नवीन चेहरे आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


















