भोर (प्रतिनिधी) –भोर तालुक्यातील कामथडी–भोंगवली जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे नव्या वळणावर आली आहेत. समाजातील प्रश्नांना वाचा फोडणारे आणि युवकांमध्ये लोकप्रिय असलेले पत्रकार वैभव धाडवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये प्रवेश करताच स्थानिक राजकारणात नवीन ऊर्जा संचारली आहे.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात धाडवे यांनी “संधीचं सोनं करून विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार” व्यक्त केला. समाजकारण, युवकांना रोजगाराच्या संधी आणि ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यात अग्रेसर असलेले धाडवे आता लोकसेवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष विकास साध्य करण्याच्या तयारीत आहेत.
पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी ‘मी उद्योजक होणार’ या पुस्तकाद्वारे युवकांना स्वावलंबनाकडे वळवले. तसेच विविध प्रेरणादायी शिबिरे आणि कार्यशाळांद्वारे शेकडो तरुणांना उद्योजकतेचा मार्ग दाखवला. शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
धाडवे यांनी आपल्या भाषणात म्हटलं, “कामथडी–भोंगवली गटातील विकास थांबलेला आहे; रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य या सर्वच क्षेत्रात नवा अध्याय लिहिण्याची वेळ आली आहे.” त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात दीर्घकालीन नियोजनाची ग्वाही दिली.
धाडवे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला कामथडी–भोंगवली गटात नवा युवा चेहरा आणि जनसंपर्काची ताकद मिळाली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून पुढे करण्याची तयारी दर्शवली असून, या गटातील राजकीय समीकरणांना आता नवं वळण मिळणार आहे.
या सोहळ्यास जिल्हाध्यक्ष विजय कोलते, तालुकाध्यक्ष रविंद्र बांदल, तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक तरुण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















