कापूरहोळ : भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे इच्छुक उमेदवार चंद्रकांत बाठे यांच्या पुढाकाराने कापूरहोळ येथे बूथ कमिटी आढावा बैठक पार पडली. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला मोठ्या संख्येने बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक बूथ पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. चंद्रकांत बाठे यांनी गटातील सर्व बूथ प्रमुखांशी थेट संवाद साधत, आगामी निवडणूक ही विकासाच्या ध्येयाने लढवायची असल्याचे सांगितले. मतदार जनजागृतीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या अँपच्या माध्यमातून मतदारांपर्यंत थेट पोहोच कशी साधायची, बूथनिहाय माहिती संकलन कसे करायचे आणि पक्षाच्या धोरणांची प्रभावी मांडणी कशी करायची, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
चंद्रकांत बाठे यांनी सांगितले की, “निवडणूक म्हणजे फक्त मतविक्री नव्हे, तर गावाच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारी प्रक्रिया आहे. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जनतेशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हीच खरी निवडणूक तयारी आहे.”
या बैठकीत बूथ कमिटी सदस्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या स्पष्टपणे समजावून सांगण्यात आल्या. निवडणूक प्रचारादरम्यान कोणती काळजी घ्यावी, मतदार संपर्क मोहिमेसाठी कोणती साधने वापरावी, तसेच सोशल मीडियाचा वापर करताना संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहनही करण्यात आले.
बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थित बूथ प्रमुखांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत बाठे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या वेळी गटातील सर्व बूथ प्रमुख, स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















