भोर | “भोर–वेल्हा–मुळशी मतदारसंघाचे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आणि विकासकामांच्या बळावर वेळू–नसरापूर गटात मी ताकदीने निवडणूक लढविण्यास सज्ज आहे,” असा विश्वास राजगड साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन पोपटराव सुके यांनी व्यक्त केला आहे. गेली वीस वर्षे सातत्याने लोकसंपर्क आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे या भागात मजबूत पायाभूत कार्य झाले असल्याचे ते म्हणाले.
सुके यांनी यापूर्वी वेळू–भोंगवली गटातून निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. “त्या वेळी मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि गेल्या दोन दशकांचा संपर्क पाहता यावेळी विजय निश्चित आहे,” असे त्यांनी सांगितले. “मा. आमदार संग्रामदादा थोपटे आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास कायम ठेवत मी पुन्हा एकदा जनतेसमोर जाण्यास उत्सुक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
राजगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत तत्काळ उपाययोजना केल्या. यंत्रनिर्माण पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक युवकांना उद्योग उभारणीसाठी कर्जसहाय्य उपलब्ध करून दिले. तसेच नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
सुके यांनी क्रीडा क्षेत्रातही विशेष कामगिरी करत विविध स्पर्धांचे आयोजन करून अनेक खेळाडू घडवले आहेत. “राजकीय, सामाजिक, औद्योगिक, क्रीडा आणि आध्यात्मिक क्षेत्रात सातत्याने काम करत आलो आहे. त्यामुळे यावेळी जनतेचा विश्वास आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मला नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यामुळे वेळू–नसरापूर गटात पोपटराव सुके यांच्या उमेदवारीची शक्यता निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत या गटात चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

















