भोर | वारजे माळवाडी पोलिसांनी फिल्मी पद्धतीने आखलेल्या पत्नीच्या खुनाचा पर्दाफाश करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील तपास “दृश्यम 3” चित्रपटाची आठवण करून देणारा ठरला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, समीर पंजाबराव जाधव (वय 42, रा. शिवणे, पुणे) याने आपल्या पत्नी अंजली समीर जाधव (वय 38) हिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार 28 ऑक्टोबर रोजी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. अंजली ही 26 ऑक्टोबर रोजी वारजे ब्रिजजवळून गायब झाल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, चौकशीत समीरच्या वक्तव्यातील तफावत आणि संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू ठेवला.
सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी समीरला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. अखेर कठोर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीचे सतेज पाटील नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून समीरने तिचा खून करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी त्याने गोगलवाडी फाटा, शिंदेवाडी परिसरात एक गोडाऊन महिन्याला 18 हजार रुपये भाड्याने घेतले आणि लोखंडी बॉक्स तयार ठेवला होता.
26 ऑक्टोबर रोजी समीरने पत्नीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून खेडशिवापूर परिसरात नेले. परतीच्या वाटेवर गोडाऊनमध्ये घेऊन जाऊन तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पेट्रोल ओतून मृतदेह जाळला व राख नदीपात्रात टाकून पुरावे नष्ट केले. लोखंडी बॉक्सही स्क्रॅपमध्ये विकला.
या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे तर याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक संजय नरळे, नितीन गायकवाड आणि पथकाने केली.














