भोर | पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश झाला.
निर्मला आवारे यांच्यासह रामचंद्र आवारे, गजानन शेटे, अमित जाधव, बाळा शेटे, उन्हाळकर चेतन आणि नितीन जंजणे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करून स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. भोर तालुक्यातील भाजपच्या संघटनात्मक पातळीवर या प्रवेशामुळे मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
भोर नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना निर्मला आवारे यांनी शहरातील अनेक विकासकामे राबविली. नगरपालिकेतील विविध विषयांवर त्यांनी पुढाकार घेत नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. मात्र अलीकडच्या काळात भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
या प्रवेश सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोर तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांना योग्य मान-सन्मान आणि स्थान मिळेल,” असे आश्वासन त्यांनी दिले. आमदार शंकर मांडेकर यांनीही आवारे दांपत्य आणि सहकाऱ्यांचे स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी होईल असे म्हटले.
भोरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपला लागलेले हे खिंडार भरून काढण्यासाठी पक्षाला नव्याने रणनीती आखावी लागणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला या नव्या बळामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य प्राप्त होण्याची शक्यता आहे.

















