भोर | प्रतिनिधी : वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही स्वघोषित नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी “पर्यटन सहली”, “यात्रा”, “पिकनिक टूर” अशा नव्या फंड्यांचा वापर केला जात असल्याची चर्चा रंगली आहे. गावातील मूलभूत प्रश्नांपासून, रस्ते-विकास, पाणी, आरोग्य यांसारख्या गंभीर मुद्द्यांपासून दुर्लक्ष करून मतदारांना सहलींच्या आमिषाने फसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
निवडणुकीचा हंगाम जवळ आला की काही नेते अचानक सक्रिय होतात, लोकांना ‘सेवा’च्या नावाखाली बस सहली, यात्रांचे आयोजन करून प्रसिद्धी मिळवू पाहतात. मात्र या सहलींनी जनतेच्या अडीअडचणी सुटणार आहेत का, हा प्रश्न मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे. वर्षभर गावात न दिसणारे हेच चेहरे निवडणुकीच्या काळात अचानक ‘जनसेवक’ म्हणून पुढे येतात, हे दृश्य आता नियमित झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून वेळू-नसरापूर गटातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवेचा अभाव आणि बेरोजगारी हे प्रश्न कायम आहेत. मात्र या समस्या सोडविण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल न उचलता केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
“सहली काढून आमचे प्रश्न सुटणार नाहीत. आमच्या गावात रस्ता नाही, दिवे नाहीत, नळाला पाणी नाही — मग या सहलींचा उपयोग काय?” असा सवाल मतदारांकडून उपस्थित होत आहे.
राजकारणातील या दिखाऊपणामुळे खऱ्या अर्थाने विकासकामांवरचा भर कमी होत चालला आहे. लोकांचे प्रश्न निवडणूक येताच नेत्यांना दिसतात आणि निवडणूक संपल्यावर पुन्हा सर्वकाही शांत होते. अशा परिस्थितीत वेळू-नसरापूर गटातील मतदारांनी आता विकासाच्या मुद्द्यावर नेत्यांना प्रश्न विचारण्याचा निर्धार केला असून “सहल नव्हे, विकास हवा” अशी मागणी उंचावू लागली आहे.


















