भोर | प्रतिनिधी : वेळू (ता. भोर) येथील समृद्धी लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) मोठी कारवाई करत अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून तीन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, तुषार शांताराम पांगारे (वय ३८, रा. वेळू, ता. भोर), योगेश नवनाथ सुर्वे (वय ३०, रा. माऊंट माची रिसॉर्ट शेजारी, गाऊडदरा, ता. हवेली) आणि गजानन भुजंगराव शिंदे (वय २३, रा. मारुती मंदिराजवळ, शिवापूर वाडा, ता. हवेली) या तिघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विकास लक्ष्मण सस्ते (वय ५४), पोलीस उपनिरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांनी स्वतःची उपजीविका चालवित असल्याचे समोर आले आहे.
या धाडसिक कारवाईदरम्यान महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पोलिसांनी लॉजमधून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
दरम्यान, स्थानिक पोलिसांना या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध व्यवसायाची कल्पना नव्हती का? किंवा त्यांच्या अनभिज्ञतेत हा व्यवसाय सुरु होता का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. काहींच्या मते, लॉजवर चालणारा व्यवसाय स्थानिक पोलिसांच्या माहितीशिवाय शक्यच नव्हता. त्यामुळे या प्रकरणाने स्थानिक यंत्रणेच्या कामकाजावर संशयाचे सावट पसरले आहे.
या कारवाईमुळे वेळू परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अनैतिक कृत्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

















