भोर | प्रतिनिधी : भोर तालुक्यात आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षबदल, प्रवेश आणि पदलोलुपतेच्या स्पर्धेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच घुसमट होत आहे. वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जोपासणारे कार्यकर्ते मागे पडत असताना, नवखे आणि स्वघोषित नेते फक्त पैशाच्या जोरावर राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेक ठिकाणी हे नेते “स्वघोषित लोकनेते” म्हणून सोशल मीडियावर झळकताना दिसतात, मात्र जमिनीवरचे कार्य मात्र शून्यच आहे. जनतेमध्ये पायाभूत काम किंवा सामाजिक योगदान नसताना देखील पैशाचा आणि प्रभावाचा वापर करून उमेदवारी मिळवण्याचा खेळ सुरू झाला आहे. अशा वातावरणात निष्ठावंत, कार्यतत्पर आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
दरम्यान, भोर तालुक्यातील राजकारणात येत्या काही दिवसांत मोठे उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. काही जण भाजप सोडून राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या गळाला लागणार आहेत, तर काही घड्याळ सोडून कमळाच्या छत्राखाली येण्याची चर्चा आहे. काही जण तुतारीसह शिंदे गटाच्या वाटेवर जाण्याची तयारी करीत असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, परगावी नोकरी-व्यवसाय करणारे काही जण अचानक “भागासाठी काम करतो” असा दिखावा करत राजकारणात प्रवेश घेत आहेत. मात्र, आपल्या भागातील खरी परिस्थिती, जनतेच्या अडचणी आणि विकासाच्या गरजा यांची जाण त्यांना नसल्याची चर्चा जनतेत रंगू लागली आहे.
राजकारणातील या “इकडून तिकडे” उड्यांनी जनतेत संभ्रम निर्माण केला असून, मतदारांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, विकासासाठी राजकारण होतंय की वैयक्तिक स्वार्थासाठी?
राजकारणात टिकायचे असेल तर फक्त पैसा नव्हे तर जमिनीवरचे काम, जनतेतील विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत, अशी चर्चा आता गावोगावी रंगताना दिसत आहे.

















