भोर | प्रतिनिधी : भोर तालुक्यातील आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आज पूर्व भागातील अक्षय सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अक्षय सोनवणे हे भोर तालुक्याच्या पूर्व भागातील कार्यकर्ते असून त्यांनी सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्व भागात बळ मिळेल, असा पक्षातील काहींचा विश्वास आहे. परंतु दुसरीकडे, या प्रवेशामुळे पक्षातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याचे दिसत आहे.
अक्षय सोनवणे यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत भोंगवली पंचायत समिती गणातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. याच गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जुने तसेच नवे कार्यकर्ते आधीच उमेदवारीसाठी तयारी करत असल्याने आता तिकडे चुरस वाढण्याची शक्यता आहे. पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा नव्याने आलेल्यांना प्राधान्य दिल्यास मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढू शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पक्षाच्या संघटनात्मक बैठकींमध्ये सातत्याने काम करणारे कार्यकर्ते आगामी निवडणुकीत संधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अक्षय सोनवणे यांच्या प्रवेशानंतर “नवीन चेहऱ्यांना पक्ष प्राधान्य देणार का?” आणि “निष्ठावंतांना डावलले जाणार का?” हे प्रश्न आता प्रकर्षाने पुढे आले आहेत.
भोर तालुक्यातील पूर्व भागातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत स्पर्धा वाढण्याची शक्यता असून, याचा परिणाम थेट पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार हे निश्चित आहे. आता पक्ष नेतृत्व कार्यकर्त्यांच्या नाराजीला कसे सामोरे जाते आणि उमेदवारीसंदर्भात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















