भोर | आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांतील इच्छुकांची मोठी गर्दी निर्माण झाली असून, या स्पर्धेत मतदारांचा उपयोग केवळ स्वार्थपूर्तीसाठी होत असल्याची चर्चा जनतेत जोरात सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीच्या काळात मतदारांच्या तोंडाला विकासाच्या आश्वासनाचे गोडवे लावले जातात, परंतु निवडणुकीनंतर त्या आश्वासनांचे पानच पुसले जाते, अशी नाराजी नागरिकांमध्ये वाढत आहे.
भोर तालुक्याचा विकास गेल्या काही वर्षांपासून राजकीय खेळात बळी पडला आहे. गट-तट, वैयक्तिक स्वार्थ आणि सत्तेच्या मोहात गुंतलेले नेते गावाच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य अशा मूलभूत सुविधांची अवस्था आजही बिकटच आहे. या समस्या सोडविण्याऐवजी नेत्यांनी राजकारणाला व्यवसायाचे रूप दिले असून, सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मतदारांचा वापर केवळ साधन म्हणून केला जात आहे.
भोर तालुक्यातील जनता मात्र आता जागरूक होत आहे. निवडणुकीच्या वेळी दिली जाणारी वचने आणि भेटवस्तूंच्या आमिषात न अडकता, विकासाचे खरे मुद्दे मांडणाऱ्या उमेदवारांची मागणी नागरिकांकडून होत आहे. “राजकारण हे सेवा करण्याचे माध्यम आहे, स्वार्थाचा व्यवसाय नाही,” असा संदेश जनतेतून उमटताना दिसत आहे.
भोर तालुक्याच्या मतदारांनी आगामी निवडणुकीत योग्य निर्णय घेतला, तरच विकासाचा खरा मार्ग मोकळा होईल. अन्यथा, पुन्हा एकदा स्वार्थाच्या खेळात जनतेच्या आशा आणि अपेक्षा गाडल्या जातील.

















