भोर : तालुक्यातील वेळू पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची प्रामाणिक इच्छा युवा निष्ठावंत कार्यकर्ते अभिजीत दिलीप कोंडे यांनी व्यक्त केली आहे. गेली चौदा वर्षे कोणतीही पदाची किंवा लाभाची अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणाऱ्या या कार्यकर्त्याची ओळख भोर तालुक्यात प्रामाणिक, जबाबदार आणि तळागाळातील जनतेशी घट्ट नाते असलेला म्हणून आहे.
अभिजीत कोंडे हे मूळचे रांजे गावचे असून आपल्या पंचायत समिती गणातील अनेक गावांमध्ये विकासकामांसाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा आणि स्थानिक अडचणी यांबाबत त्यांनी सतत पाठपुरावा करून अनेक कामे प्रत्यक्षात पूर्णत्वास नेली आहेत. या कामामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख आज ‘काम करणारा कार्यकर्ता’ म्हणून केला जातो.
कोंडे म्हणाले, “वेळू गणात बदल घडवायचा असेल, तर पक्षाने युवा पिढीवर विश्वास ठेवला पाहिजे. जर मला संधी मिळाली, तर ती संधी वाया जाऊ देणार नाही. गावोगाव विकासाचे सोने घडवेन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अभिजीत कोंडे यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आमदार राहुल दादा कुल, माननीय राजेशजी पांडे, माजी आमदार संग्राम दादा थोपटे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गरुड, जीवन आप्पा कोंडे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष वैभवजी सोलंकर आणि संतोषजी धावले यांच्या आशीर्वादाने आपण कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
“भाजपने जर निष्ठावंत, काम करणाऱ्या तरुणांना पुढे आणले, तर वेळू पंचायत समिती व नसरापूर जिल्हा परिषद या दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाचा झेंडा नक्कीच फडकणार,” असा ठाम विश्वास अभिजीत कोंडे यांनी व्यक्त केला.

















