भोर – राजगड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस लागवड विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत ऊस लागवडीचा शुभारंभ भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील मौजे खानापूर येथे झाला. या कार्यक्रमात भोर-राजगड-मुळशीचे आमदार व कारखान्याचे चेअरमन मा. संग्रामदादा थोपटे यांच्या शुभहस्ते ऊस लागवड कार्याचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी शेतकरी जितेंद्र भरत पोळ व शिवाजी रामभाऊ थोपटे यांच्या शेताच्या बांधावर को ८६.०३२ या जातीचे निकोप ऊस बियाणे उपलब्ध करून देण्यात आले.
संग्रामदादा थोपटे म्हणाले की, “राजगड साखर कारखान्याचा आगामी गाळप हंगाम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढविण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागवडीसाठी बियाणे थेट शेताच्या बांधावरच उपलब्ध करून देत आहोत. तसेच ऊस लागवडीसाठी लागणारी खते टप्प्याटप्प्याने पुरवली जाणार आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचाही लाभ मिळवून देण्याचा कारखान्याचा संकल्प आहे.”
या प्रसंगी राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन पो.रा. सुके, संचालक उत्तमराव थोपटे, सुभाषराव कोंढाळकर, सुधीर खोपडे, अरविंद सोंडकर, अनिल सावले, अतुल किंद्रे, अमर बुदगुडे, संदीप नांगरे, मधुकर कानडे, राजेंद्र शेटे, पोपटराव मालुसरे आदी मान्यवर तसेच परिसरातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

















