भोर -कापूरव्होळ- पुणे मार्गावर भोर शहराची कमान प्रवेशद्वार सोडताच नवीन -जुना सुरू होतो या दोन्ही पूलावरील रस्त्यावर जागोजागी भले मोठे खड्डे पडुन रस्त्याची चाळण झाली आहे.दोन्ही पूल संपल्यानंतर या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर जरी सुरू असले तरी मात्र या रस्त्याच्या देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष संबंधित विभागाने केल्याचे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदारही याकडे कानाडोळा करत असून रस्त्याच्या साईड पट्टीला असणारे मोठमोठे खड्डे याचे उदाहरण असुन वाहने चालवताना चालकांना खूप कसरत करावी लागत आहे. दुचाकी स्वारांचे छोटे मोठे अपघात होत आहेत. या रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या लोकांच्या तसेच शाळकरी मुलांना येथून जाताना जिकिरीचे होत आहे. वेळप्रसंगी खड्ड्यातील पाणी अंगावर उडण्याचे प्रकार घडत आहेत. याच मार्गावर एक विद्यालय व एक इंग्लिश मीडियम स्कूल आहेत. सकाळी सकाळी मुलांना शाळेत सोडताना पालकांची प्रचंड कसरत होत असून या रस्त्यावरील खड्डे ही नित्याची बाब झाली आहे.
दोन महिन्यापूर्वी या रस्त्यासाठी शाळकरी विद्यार्थी तसेच नागरीक यांचे मोठे रास्ता रोको जनआंदोलन झाले होते त्यावेळेस संबंधित विभागाने ३१ ऑक्टोबर पर्यंतची मुदत घेतली आहे .परंतु रस्त्याचे संथगतीचे काम पाहता सदर काम अजून दोन महिने पूर्ण होणार नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
सध्या दिवाळीची सुट्टी असून विद्यार्थ्यांची शाळेत जाणारी संख्या जरी कमी असली तरी ऐन दिवाळीत सणासुदीला पुण्यावरून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या आहे परंतु त्यांना व दररोज कामासाठी ते जा करणा-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भाटघर सांगवी ते भोर या कमी अंतरावर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असले तरी रस्त्यावरील खड्डे व धुरळा याने प्रवाशांचे मोठे हाल झाले तसेच रामबाग रस्तावर देखील रस्त्याच्या कामाने नागरिक वैतागून गेले आहेत. या रस्त्यांवरून दुचाकीस्वार , चारचाकी वाहन चालक यांना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे

















