नसरापूर : भोर-राजगड तालुका जेसीबी मालक संघटनेने मशिनच्या वाढत्या देखभाल आणि इंधनखर्चामुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून जेसीबी मशिनसाठी तासाचा दर एक हजार रुपयांवरून एक हजार दोनशे रुपये करण्यात आला असून, याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष देवदत्त कोंडे यांनी केली.
या बैठकीस उपाध्यक्ष तानाजी खाटपे, कार्याध्यक्ष राहुल बांदल, तसेच गोपाळ मसुरकर, संदीप खाटपे, राहुल मळेकर, लक्ष्मण ढेबे, निखिल मराठे, भानुदास थिटे यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. संघटनेत भोर आणि राजगड या दोन्ही तालुक्यांतील सुमारे ३०० सदस्यांचा समावेश आहे.
दरवाढीची कारणे सांगताना अध्यक्ष कोंडे म्हणाले की, “जेसीबी मशिन आज शेती, बांधकाम, रस्ते व खोदकाम यांसारख्या क्षेत्रांसाठी अत्यावश्यक झाले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत इंधनदर, टायर, ऑइल, स्पेअरपार्टस, तसेच दुरुस्तीचा खर्च झपाट्याने वाढला आहे. शिवाय चालकांच्या पगारातही वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून दरवाढ अपरिहार्य झाली आहे. केळवडे येथे नुकत्याच झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
या निर्णयामुळे शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार असला तरी संघटनेने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “दरवाढीमुळे आम्हालाही व्यवसाय टिकवणे शक्य होईल. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा,” असे कोंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नव्या दराला विरोध करून जर कोणी कमी दराने मशिन उपलब्ध करून दिली, तर अशा चालकांवर संघटनेमार्फत कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे तालुक्यातील बांधकामे, शेतमाल प्रक्रिया केंद्रे, तसेच रस्ते कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र संघटनेच्या मते, ही दरवाढ काळाची गरज आहे आणि त्यामुळे मशिनधारकांना आर्थिक तोटा टाळता येईल.