मुंबई/भोर -शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा सन २०२५-२६ मंगळवार (दि.२३) रोजी ऐरोली मुंबई येथे पार पडली. यामध्ये भोर तालुक्यातील शिंद गावातील श्रावणी ज्ञानेश्वर इंगवले या मुलीने नवी मुंबई येथे झालेल्या जिल्हा स्तरीय (२०२५-२६) कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून आपल्या गावचे व तालुक्याचे नाव रोशन केले आहे.
सध्या नोकरी निमित्त व मुलांच्या शिक्षणासाठी ज्ञानेश्वर इंगवले हे वास्तव्यास नवी मुंबई येथे आहेत. वय वर्षे १४, १७ व १९ वर्षाखालील वयोगटाच्या मुला मुलीं करिता ही कराटे स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेकरिता तांत्रिक समिती म्हणून कराटे डू असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी काम पाहिले . नवी मुंबई वाशी कोपरखैरणे आर.एफ.नाईक विद्यालयाची श्रावणी हि विद्यार्थिनी असुन जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याने गावाकडे आजूबाजूच्या परिसरात तिचे मोठे कौतुक होत आहे. श्रावणी ज्ञानेश्वर इंगवले ही इयत्ता ९ ची विद्यार्थीनी असुन १४ वर्षे वयोगटात तिने हे सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिला नवी मुंबई येथील विनर्स कराटे असोसिएशन येथील कराटे मास्टर किशोर इथापे सेन्साई यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मला माझ्या गुरूंजनाचे , शालेय शिक्षकांचे आई वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे श्रावणीने सांगितले