भोर : आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत ग्रामीण भागालाही डिजिटलायझेशनशी जोडण्याच्या दिशेने जोगवडी ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गावामध्ये डिजिटल नेमप्लेट प्रकल्पाचे उद्घाटन सरपंच अश्विनीताई रवींद्र धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील प्रत्येक घराची नोंद डिजिटल स्वरूपात सुलभ व अचूक पद्धतीने उपलब्ध होणार असून प्रशासनाशी ग्रामस्थांचा संपर्क अधिक सुकर होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी जालिंदर कळमकर, माजी सरपंच राजेंद्रजी धुमाळ, माजी सरपंच संतोष धुमाळ, उपसरपंच सौ. माया सावंत, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सावंत, कर्मचारी तानाजी धुमाळ, संगणक कर्मचारी संगीता हरगुडे यांची उपस्थिती होती. याशिवाय रविंद्रजी धुमाळ, विजय धुमाळ, उमेश धुमाळ, सागर धुमाळ, सोमनाथ तात्या धुमाळ, बाबुराव धुमाळ आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना सरपंच अश्विनीताई धुमाळ म्हणाल्या की, “डिजिटल नेमप्लेट हे केवळ एक फलक नसून गावाच्या स्मार्ट व डिजिटल भविष्यासाठीचे पहिले पाऊल आहे. या माध्यमातून प्रत्येक घराची अचूक माहिती उपलब्ध राहील. शासनाच्या विविध योजना, शासकीय कागदपत्रांची पूर्तता तसेच आपत्कालीन सेवा पुरविण्यास ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल.”
ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामपंचायतीच्या या पुढाकाराचे कौतुक केले. यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम व नागरिकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागात डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक आदर्श पाऊल ठरेल, असेही मान्यवरांनी नमूद केले.
जोगवडी ग्रामपंचायत ही नेहमीच गावाच्या प्रगतीसाठी नवीन उपक्रम राबवित असते. डिजिटल नेमप्लेट प्रकल्पामुळे गावाच्या स्मार्ट आणि डिजिटल भविष्यासाठीची वाटचाल अधिक वेगवान झाली असून जोगवडीने खऱ्या अर्थाने डिजिटल युगाकडे झेप घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.