नसरापूर : पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी हद्दीत कात्रज बोगद्याजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही घटना घातपाताची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मृत तरुणाची ओळख सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंढरपूर, सध्या रा. मांगडेवाडी, पुणे) अशी पटली आहे. कुटुंबीयांनी कालच सौरभ बेपत्ता झाल्याची तक्रार कात्रज पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर आज सकाळी शिंदेवाडी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळाची माहिती मिळताच राजगड पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. नेमक्या कोणत्या कारणातून ही हत्या झाली, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्राथमिक तपासात काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असल्याचे समजते.
सौरभ आठवले आपल्या कुटुंबासह पुण्यातील मांगडेवाडी येथे वास्तव्यास होता. तो काल संध्याकाळपासून बेपत्ता होता. दरम्यान, कुटुंबीयांनी त्याच्या शोधासाठी कात्रज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह महामार्गालगत शिंदेवाडी येथे आढळून आला.या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून, वैयक्तिक वाद, व्यवहारातील मतभेद की अन्य कोणते कारण याचा तपास सुरू आहे.