Bhor – पांगारीच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची बाधा
२० विद्यार्थी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय भोर येथे दाखल
भोर – तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील पांगारी येथील शासकीय आश्रम शाळेतील वीस विद्यार्थ्यी संसर्गजन्य आजाराने बाधित झाले असून सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय भोर येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू केले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखत आहे काहींना उलट्या ,डोके दुखी ,अंग दुखी,ताप ,थंडी,घसा खवखवणे अशी लक्षणे दिसून आहेत. दोन दिवसांपूर्वी दोन ते तीन विद्यार्थ्यांना अंगदुखी, ताप, पोटदुखी असा त्रास झाला होता. उपकेंद्रात औषध घेतल्यानंतर मुलांचा वाढता संसर्ग पाहता आजाराची लक्षणे दिसणाऱ्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय भोर येथे दाखल केले असल्याचे आश्रम शाळेच्या मुख्याध्यापक श्रीकृष्ण दहिफळे यांनी सांगण्यात आले.
आश्रम शाळेत एकूण एकशे तीस विद्यार्थी असून वीस विद्यार्थ्यांना व्हायरल इन्फेक्शन मुळे वेगवेगळ्या आजारांची बाधा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पंधरा विद्यार्थी व पाच विद्यार्थिनी यांना ॲम्बुलन्स मध्ये उपजिल्हा रुग्णालय भोर येथे आणले आहे.त्यामधीव पाच विद्यार्थ्यांना सलाईन लावले असून योग्य ते उपचार सुरू केले व उर्वरित विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना औषधे देण्यात आली आहे असे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.