नसरापूर (प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे (रा. कोढणपूर, ता. हवेली) यांच्यावर ५ लाख रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार पुरंदर तालुक्यातील दुरकरवाडी, गराडे येथील ६९ वर्षीय शेतकरी बाळसाहेब विश्वनाथ दुरकर यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे गराडे येथील गट नं. १३१२ मधील दुरकर कुटुंबाची ३ एकर जमीन सात महिनेपूर्वी रिंगरोडसाठी संपादित झाली होती. शासनाकडून कुटुंबाला ३ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती, ज्यापैकी ७८ लाख रुपये बाळसाहेब दुरकर यांचा वैयक्तिक हिस्सा होता. खेडशिवापूर येथील बापू गायकवाड यांच्या मार्फत दुरकर यांची प्रदीप कांबळे यांच्याशी ओळख झाली. मंत्रालयातील ओळखीचा वापर करून पैसे काढून देण्याचे आश्वासन कांबळे यांनी दिले.
दोन दिवसांतच शासनाकडून थेट ७८ लाख रुपये दुरकर यांच्या खात्यात जमा झाले. मात्र, २९ डिसेंबर २०२४ रोजी कांबळे यांनी लॉन्ड्रीत भेट घेऊन “पैसे माझ्या प्रयत्नातून मिळाले, मला ५ लाख रुपये द्या” अशी मागणी केली. दुरकर यांनी शासनाकडून थेट पैसे मिळाल्याचे सांगत मागणी नाकारली.
यानंतर कांबळे अनोळखी ९–१० जणांसह गराडे येथे दुरकर यांच्या घरी आले. त्यांनी पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी केली व पैसे न दिल्यास “तुला बघून घेतो, खोटी अॅट्रॉसिटी केस लावतो” अशी धमकी दिली. राजकीय पदाचा गैरवापर करून दबाव आणल्यामुळे दुरकर यांनी भीतीपोटी तक्रार दिली नव्हती.
जानेवारी २०२५ मध्ये कांबळे यांनीच दुरकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याची नोटीस राजगड पोलिसांकडून आली. त्यामुळे खोटा अर्ज देऊन दबाव आणला जात असल्याचे स्पष्ट झाले. कांबळे वेळोवेळी बापू गायकवाड यांच्यामार्फत पैशाबाबत विचारणा करत राहिले.
३१ जुलै रोजी दुरकर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास आले होते, मात्र अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा लागेल या भीतीने परत गेले. अखेर कुटुंबीय व गाव सरपंच वसंत रावडे यांच्या सोबत १० ऑगस्ट रोजी त्यांनी तक्रार नोंदवली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.