नारायणगाव (प्रतिनिधी) : ग्रामोन्नती मंडळ शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नारायणगाव येथील सहाय्यक प्राध्यापक सुनिता भाऊ कांबळे (सुनिता अभिजीत पाटोळे) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी ‘इंटर डिसिप्लिनरी स्टडीज’ या विद्याशाखेअंतर्गत “स्वमग्न विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक कार्यक्रम निर्मिती व परिणामकारकता” या संशोधन विषयावर आपला प्रबंध सादर केला.
या संशोधनप्रबंधामध्ये त्यांनी स्वमग्न (Autistic) विद्यार्थ्यांसाठी विशेष उपचारात्मक शैक्षणिक कार्यक्रम तयार करून त्याची परिणामकारकता अभ्यासली आहे. त्यांच्या या संशोधनात आधुनिक शिक्षणतंत्र, मानसशास्त्रीय अभ्यास व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन सखोल विचारमंथन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. रवींद्र मारुती चोभे (विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ एज्युकेशन, अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रबंध तयार करण्यात आला.
सुनिता कांबळे या सध्या ग्रामोन्नती मंडळ शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, त्या गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापन, संशोधन व विद्यार्थी कल्याण कार्यात सक्रीय आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे चेअरमन श्री. ऋषिकेश मेहेर, प्राचार्य डॉ. बी. एस. मुरादे, मार्गदर्शक डॉ. राहुल गोंगे, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रा. सुनिता कांबळे यांचे शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.