नसरापूर | राजगड पोलीस ठाणे हद्दीतील केळवडे (ता. भोर) येथील एचपी कंपनीच्या “राजगड मेट्रो पावर स्टेशन” या पेट्रोल पंपावर झालेल्या दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी असा एकूण २०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक ६ जुलै २०२५ रोजी पहाटे १.२५ वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात युवक दोन अॅक्सेस दुचाकींवरून पेट्रोल पंपावर आले. त्यांनी संग्राम कांबळे (वय १८, रा. कांजळे, ता. भोर) या कर्मचाऱ्याला धमकावून व्हिवो व सॅमसंग मोबाईल आणि ६,००० रुपये रोख असा ऐवज जबरदस्तीने चोरला. या प्रकरणी बीएनएस ३०९ (४), ३ (५) व आर्म अॅक्ट ४ (२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्त तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपी पुण्यातील कात्रज परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खेडशिवापूर येथे सापळा रचून समीर हकीक खान (१८, रा. भारतनगर, कात्रज), महेंद्र ठाकूर (१९, रा. जांभुळवाडी, पुणे) व चार अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत करण सकट (रा. कात्रज) यालाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, ३,००० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेश गवळी, सपोनि दत्ताजीराव मोहिते, सपोनि तुकाराम राठोड, पोसई अजित पाटील, तसेच पोलीस अंमलदार अमोल शेडगे, अतुल डेरे, रामदास बाबर, अजित भुजबळ, मंगेश भगत, धीरज जाधव व अक्षय नलावडे यांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली.