भोर/वेल्हा : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत ‘जाणता राजा प्रतिष्ठान’ आणि आदित्य प्रकाश बोरगे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने *‘बालसंगोपन योजना शिबिरा’*चे आयोजन रविवार, 13 जुलै 2025 रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर जानकीराम मंगल कार्यालय, नसरापूर (ता. भोर) येथे सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार आहे.
भोर आणि राजगड (वेल्हा) तालुक्यातील एकल बालक (वडील नसलेली) व अनाथ बालकांसाठी हे शिबिर अत्यंत महत्वाचे ठरणार असून, या शिबिराद्वारे संबंधित बालकांची शासकीय ‘बालसंगोपन योजना’ अंतर्गत नोंदणी करून, त्यांना मिळणाऱ्या विविध लाभांचा थेट लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
या योजनेद्वारे लाभार्थी बालकांना दरमहा आर्थिक मदतीसह शिक्षण, आरोग्य, निवास आणि संगोपनाच्या मूलभूत गरजांबाबतही सहकार्य दिले जाते. अनेक बालकांना योग्य मार्गदर्शनाअभावी शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, यामुळेच स्थानिक पातळीवर हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनात सांगण्यात आले आहे की, संबंधित तालुक्यांतील नागरिकांनी आपल्या परिसरातील अशा गरजू बालकांपर्यंत या शिबिराची माहिती पोहोचवावी. त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून अधिकाधिक बालकांना सुरक्षित भविष्याची दिशा मिळू शकेल.
या शिबिरात नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, वयाचा पुरावा, मृत्यू प्रमाणपत्र (वडील किंवा दोघांचे) आणि आधार कार्ड आवश्यक आहे.