नसरापूर (दि. १० जून) : कापूरव्होळ – भोर रस्त्यावर माळवाडी गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. शुभम राजेंद्र पवार (वय २७, रा. आळंदे) असे मृत तरुणाचे नाव असून, कुणाल जालिंदर खोपडे (रा. आळंदे) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभम व कुणाल हे दुचाकी (एम.एच. १२ पी.एक्स. ९९७९) वरून भोरकडे जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या व्हॅगनर कार (एम.एच. १२ एल.जे. ०५६१) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये शुभम राजेंद्र पवार (वय २७, रा. आळंदे) हा जागीच मृत पावला असून, कुणाल जालिंदर खोपडे (रा. आळंदे) हा अपघातात गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे अंमलदार तुषार खेंगरे, प्रशांत राऊत, मयुर निंबाळकर , गणेश साळुंके, तसेच ट्राफिक वार्डन शिंदे व कांबळे काही क्षणांत घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून अपघातग्रस्तांना तात्काळ आपल्या खासगी वाहनाने भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी शुभम पवार याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्याच्या आकस्मिक निधनाने आळंदे गावावर शोककळा पसरली आहे. दुसरीकडे, पोलिस व नागरिकांच्या वेळेवरच्या मदतीमुळे कुणाल खोपडे याचे प्राण वाचवन्यात यश आले.
या अपघाताबाबत राजगड पोलीस तपास करत असून, संबंधित कारचालकाविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.