शेती, उद्योग, व्यापार,शेती व्यवसाय, शैक्षणिक आणि आरोग्य सेवा तसेच पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना
भोर तालुक्याच्या उत्तरेकडील भाटघर धरण क्षेत्रात येसाजी कंक जलाशय म्हणजेच वेळवंडी नदी किनारी असलेल्या वेळवंड खो-यातील वेळवंड (ता.भोर) व भुतोंडे खो-यातील कांबरे (ता.भोर) दोन भागातील गावांच्या या मार्गावर भविष्यात उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पुलाच्या संभाव्य जागेची पाहणी शनिवार (दि.१५) भोर , राजगड (वेल्हा), मुळशीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या पुलाच्या उभारणीमुळे परिसरातील दळणवळण सुकर होणार असून, नागरिकांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे असे यावेळी शंकर मांडेकर यांनी सांगितले.
या पुलाच्या उभारणीमुळे वेळवंड व कांबरे गावांसह आसपासच्या भागातील शेती व्यवसाय, शैक्षणिक आणि आरोग्य सेवा तसेच पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणाऱ्या भागातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. या पाहणी दौऱ्यात आमदार शंकर मांडेकर यांच्यासह, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे ,पसुरेचे विद्यमान सरपंच पंकज धुमाळ, भोलावडेचे सरपंच प्रविण जगदाळे, सोमनाथ धुमाळ, कुणाल धुमाळ, विशाल धुमाळ, नामदेव धोत्रे, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, तरुण , तांत्रिक अधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी पुलाच्या उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी आणि भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. येत्या काळात हा पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि लोकांना जलदगतीने सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले.