पुणेः विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करुन खून करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. सतीश वाघ असे टिळेकर यांच्या मामाचे नाव असून त्यांचे शेवाळवाडी येथील एका हॅाटेलसमोरुन चार चाकी वाहनातून अपहरण करण्यात आले होते. यानंतर काही तासातच वाघ यांचा मृतदेह शिंदवणे येथील घाटात पोलिसांना मिळून आला. या घटनेत आता आरोपींचा शोध लागला असून वाघ यांच्या शेजारीच राहणाऱ्या एका तरुणानेच त्यांची सुपारी देऊन अपहरण करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैयक्तिक वादातून ही सुपारी देण्यात आली असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी पवन श्यामकुमार शर्मा (वय ३०, रा. धुळे ), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३२, रा. फुरसुंगी ) तसेच अक्षय हरीश जावळकर आणि विकाश शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांचा सहभाग असल्याचे उघड आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत अपहरण व खून केल्याप्रकरणी विविध कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घटनाक्रम थोडक्यात
- आमदार टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ (वय ५८) हे सोमवारी ९ डिसेंबर नेहमीप्रमाणे मार्निंग वॅाकला गेले होते.
- पहाटे साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर कारमधून आलेल्या चौघांनी त्यांचे अपहरण केले.
- कारमध्येच त्यांचा गळा दाबून तसेच दांडक्याने व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला.
- खुनानंतर वाघ यांचा मृतदेह उरळी कांचन परिसरातील शिंदवणे घाटात टाकून आरोपी पसार झाले.
- हा सर्व प्रकार अवघ्या तासा भरात घडला होता.
पोलिसांची वेगवान गतीने फिरवली तपासाची चक्रे
अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी वेगवान गतीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली. मात्र, वाघ यांचा थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता. याचवेळी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाघ यांचा मृतदेह पोलिसांना उरळी कांचन येथे असलेल्या शिंदवणे घाटात मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी सर्व घटनाक्रम लक्षात घेत अपहरण आणि खून या दिशेने आपला तपास सुरू केला. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी शर्मा व गुरसाळे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अपहरण आणि त्यानंतर खून अशी प्राथमिक माहिती मिळाली आता प्रश्न होता खूनाचे कारण ?
शेजाऱ्यानेच केली गेम
पोलिसांनी सुपारी देणाऱ्या अक्षय जावळकर याला ताब्यात घेतले. चौकशीत अक्षय जावळकर हा पूर्वी भाडेकरू म्हणून सतीश वाघ यांच्याकडे राहत होता. त्यांच्यात पुर्वीच वादावादी झाली होती. याचा राग मनात धरून अक्षय याने शर्मा याला ५ लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. असे असले तरी पोलिसांनी अक्षय व विकास शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली असून अद्यापर्यंत ठोस कारण समोर आलेले नाही. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
गुन्हा गंभीर असला तरी तो वैयक्तिक कारणातून घडला आहे. पोलिसांनी जवळपास साडे चारशे सीसीटीव्ही पडताळत युद्धपातळीवर तपास करून तिघांना अटक केली असून, या गुन्ह्यात १२० ब नुसार कलम वाढ केली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. आरोपींना कडक शिक्षा होईल अशीच कारवाई होईल. पुणे पोलीस शहरातील कायदा-सुव्यवस्था आभादीत ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सज्ज आहेत. ही घटना वैयक्तिक कारणातून घडली आहे. जनतेला विश्वास देऊ इच्छितो की, पुणे यापेक्षाही अधिक शांतताप्रिय व सुरक्षित राहील व ते ठेवण्यासाठी पोलीस तत्पर आहेत. पोलिसांवर विश्वास ठेवावा.
– अमितेशकुमार, पोलीस आयुक्त