भोर: बांग्लादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच हिंदूवर होत असलेल्या अत्याचारासाठी निषेध नोंदविणाऱ्या संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांच्यावर तिथल्या सरकाने देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना अटक केली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद भारतातील विविध राज्यात उमटल्याचे दिसत आहे. भारत देशातील हिंदू समाजातील व्यक्तींनी या घटनेचा निषेध नोंदवत भारत सरकारने या प्रकरणी दास यांच्या सुटकेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भोर शहरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी भोरचे तहसिलदारांना निवेदन दिले आहे.
बांग्लादेशमध्ये ४ ते २० ऑगस्ट दरम्यान ५० जिल्हांमध्ये हिंदू समाजावर २००० हुन अधिक जातीय हल्ले झाले. यामध्ये हिंदू घरे, हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील देखील हल्ल्यांचा समावेश आहे. बांग्लादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात असलेला प्रचंड रोष विविध माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे. निवेदनाच्या माध्यमातून भारतीय राज्य शासनापर्यंत हिंदूंच्या भावना पोहोचवण्यासाठी बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घ्यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना
या मागणीचे निवेदन भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले. यावेळी भोर शहरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना तसेच हिंदु धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून, उध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे. हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत. बांग्लादेशामधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे कि, हिंदू महिलांवर सामूहिकरित्या बलात्कार घटना पुढे आल्या आहेत. बांग्लादेशमध्ये काही ठिकाणी तर हिंदूंवर अत्याचार होत असताना बांग्लादेशाचे लष्करच स्वःताह त्या अत्याचारांना खतपाणी घालत असल्याचे दिसत सांगितले जात आहे.