पुणेः खडकवासाला येथील सुशीला पार्कच्या येथे दि. २७ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीची चार जणांच्या टोळ्याने अत्यंत निर्घूणपणे कोयत्याने वार करुन खून केला होता. या घटनेत सतीश थोपटे वय ३७ वर्ष यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हवेली पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवून या घटनेतील चार आरोपींच्या चोवीस तासांच्याआत शोध घेऊन मुसक्या आवळल्या आहेत. या चारही आरोपींवर विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयत सतशी यांच्या पत्नीने याप्रकरणी हवेली पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
स्टेटस ठेवला म्हणून केला गेम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश सुदाम थोपटे यांचा भाऊसाहेब सदाशिव किवळे (रा. धायरीफाटा, हवेली पुणे) यांच्यासोबत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. सतिश थोपटे यांनी फ्लॅटवर कर्ज काढून कर्जाची रक्कम १८ लाख ५० हजार हे भाऊसाहेब किवळे यांना दिले होते. सदरचे कर्ज भाऊसाहेब किवळे हे भरणार असे त्यांच्यात ठरले होते. परंतु कर्जाची रक्कम न भरल्याने सतिश थोपटे यांनी पैसे मागण्यास सुरूवात केली. पैसे मिळत नसल्याने सतिश थोपटे यांनी “भाऊसाहेब किवळे याने कर्ज भरले नसून त्याची कर्ज भरण्याची लायकी नाही” असे व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवले होते. त्याचा राग मनात धरून भाऊसाहेब किवळे याने त्याच्या चार साथीदारांना पाठवून सतिश सुदाम थोपटे (वय ३७ वर्षे, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी) येथे कोयत्याने वार करून खून केला.
आरोपींमध्ये रेकॅार्डवरील गुन्हेगारांचा सहभाग
सदरचा गुन्हा हा लोकवस्तीत भरदिवसा घडला असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेवून त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरु करण्यात आला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. चार अनोळखी व्यक्तींकडून कोयत्याने मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींची ओळख पटविण्याकरिता गोपनीय बातमीदारांकडे संपर्क केला असता, आरोपीपैकी एक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे नाव देवा लक्ष्मण तांबट रा. कांजळे, भोर असे असल्याचे सांगितले.
सापळा रचून घेतले ताब्यात, मुख्य आरोपी अद्यापही फरार
त्याअनुषंगाने त्याचा शोध घेत असताना चारही आरोपी हे खेड शिवापूर परिसरात असून ते कोल्हापूरकडे पळून जाण्याच्या तयारीत आहेत, अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने ताबडतोब कारवाई करत आरोपी जिवन ऊर्फ बाळा शैलेश जगताप (वय २७ वर्षे, रा. दत्तवाडी, भंडारी हॉटेलच्या मागे, चोर गल्ली पुणे), अक्षय ऊर्फ बाबु बालाजी शेलार (वय २४ वर्षे, रा. शिवरे, ता. भोर. जि पुणे), सोहेल ऊर्फ फुक्या साजिदअली जोरा (वय १९ वर्षे रा. शिवरे बस स्टँन्ड शेजारी ता. भोर जि. पुणे), देविदास ऊर्फ देवा लक्ष्मण तांबट (वय २० वर्षे, रा. कांजळे, तांबट आळी, ता. भोर जि पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडे प्राथमिक चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी देविदास ऊर्फ देवा लक्ष्मण तांबट याच्यावर यापूर्वी खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी भाऊसाहेब किवळे याचा शोध चालू आहे.
सदरची कार्मागरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, हवेली विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदोप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, अभिजीत सावंत, अंमलदार हनुमंत पासलकर, रामदास बाबर, राजू मोमीण, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, मंगेश भगत, वैभव सावंत, काशिनाथ राजापुरे, हवेली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, संजय सुतनासे, अंमलदार विलास प्रधान, राजु मुंढे, संतोष तोडकर, महेद्र चौधरी यांनी केली असून, पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.