पारगांवः धनाजी ताकवणे
दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अॅड. राहुल कुल हे तिसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाले आहेत. राहुल कुल यांना १३९०६ हजार मताधिक्य मिळाले आहे. दौंड विधानसभेची मतदार संघातील निवडणूक २० नोव्हेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत खरी लढत कुल आणि थोरात यांच्यातच पहायला मिळाली. एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.०० वा. एकुण २३ फेऱ्यांची मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच राहुल कुल यांना लीड होते, ते शेवटपर्यंत तसेच राहिले. साधारण १३९०६ हजार मतांनी राहुल कुल विजयी झाले. कुल यांनी माजी आमदार रमेश थोरात यांचा तिसऱ्यांदा पराभव केला.
दौंड तालुक्याची कुल विरुद्ध थोरात ही अटीतटीची लढत मानली जात होती. रमेश थोरात यांनी राहुल कुल यांच्यासमोर मोठे आव्हान ठेवले होते. परंतु याही वेळेस त्यांना तिसऱ्यांदा निराशा हाती आली आणि त्यांचा पराभव झाला. दौंड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांची तिसऱ्यांदा दौंडच्या जनतेने आमदारपदी निवड केली आहे.
कारण या निवडणुकीत राहुल कुल यांना पराभूत करण्यासाठी दौंड तालुक्यात अनेक खासदारांनी ताकद लावली होती. मात्र जनतेने राहुल कुल यांची विकास कामे, तालुक्यातील नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न सोडवणे, लक्षात घेत त्यांना तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून दिले आहे. तसेच आता तालुक्यात ठिकठिकाणी मोठा जल्लोष सुरु असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दौंड विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे नव्हे, तर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
माजी आमदार रमेश थोरात यांना शरद पवारांचे तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर निवडणुकीत मोठी चूरस पहायला मिळत होती. त्यामुळे दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच प्रत्येकजण निवडणूक निकालाची आतुरतेने वाट पाहत होता. यावेळी विद्यमान आमदार राहुल कुल की माजी आमदार रमेश थोरात हे विजयी होणार यावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार विजयी होईल, असा दावा प्रति दावा केला होता.