जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघाची मतमोजणीची प्रक्रिया उद्या दि. 23 नोव्हेंबर रोजी सासवड शहरातील प्रशासकीय इमारत, पारगाव रोड, सासवड ता. पुरंदर येथे होणार आहे. यामुळे मतमोजणीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमाण्याच्या शक्यता असल्याने या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता तीन मुख्य पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना थांबण्यासाठी तीन वेगवेगळी ठिकाणे देण्यात आलेली आहेत. निवडणूक मतमोजणीचा दिवस असल्याने वाहतूकीत देखील बदल करण्यात आले आहेत.
‘ही’ आहेत तीन ठिकाणे
तीन मुख्य पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी थांबवता यावे याकरीता आंबोडी रोड, मातोश्री साडी सेंटर समोरील मैदान, एमएसईबी कार्यालयाचे पुर्वेबाजला असणारे क्षेत्र, प्रशासकीय इमारतीसमोर पार्किंगकरिता तयार करण्यात आलेले क्षेत्र अशी तीन ठिकाणे उद्या दि. २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अधिगृहीत केली असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
‘असा’ असणार वाहतूकीत बदल
या काळात जेजुरी नाक्यापासून शिवराज फॅब्रीकेशन, एमएसईबी पर्यंतचा रस्ता बंद ठेवून दरम्यानच्या काळात सदर रस्त्यावरील पारगावकडे जाणारी वाहतूक जेजुरी नाका-धुमाळ पेट्रोल पंप पापीनाथ सोसायटी विजय कोलते बंगला पारगाव रोड अशी वळवण्यात आली आहे. पारगावकडून येणारी वाहतूक शिवराज फॅब्रीकेशन एमएसईबी शेजारीपासून भोंडेनगर सासवड आंबोडी रोड सासवड अशी वळविण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली असल्याची माहिती देखील अधिकारी यांनी दिली.