नसरापूर (ता. भोर) : भोर तालुक्यातील हिंगेवाठार गावातील तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा वाद अखेर तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या मध्यस्थीमुळे सामोपचाराने मिटला. गुरुवारी (दि. २८ ऑगस्ट) ग्रामस्थांच्या संमतीने हा रस्ता सर्वांसाठी खुला करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीकडे आणि शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला सर्वे बांधावरील हा रस्ता अनेक दशकांपासून वादग्रस्त होता. यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र तहसीलदार नजन यांनी स्वतः गावात हजेरी लावून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला आणि रस्त्याचे महत्त्व पटवून दिले.
गुरुवारी सकाळपासून दिवसभर त्यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा केली. गावाच्या विकासासाठी एकोपा आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. शेवटी ग्रामस्थांनी एकमताने रस्ता खुला करण्यास संमती दिली. परिणामी चार दशकांचा वाद मिटून गावाला दिलासा मिळाला.
भोर तालुक्यातील प्रलंबित वादग्रस्त रस्त्यांवर तोडगा काढण्याचे कार्य तहसीलदार नजन यांनी यापूर्वीही केले असून, त्यांच्या कारकीर्दीतील ही आणखी एक लोकाभिमुख कामगिरी ठरली आहे. स्थानिक प्रश्नांना सामोपचारातून न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या पद्धतीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
या प्रसंगी मंडलाधिकारी पांडुरंग लहारे, तलाठी राहुल गायकवाड, पोलीस पाटील सिकंदर हिंगे, दिनकर शिवणकर, कुंदन हिंगे, सचिन कदम, दिलीप शिवणकर, बबन हिंगे, रमेश हिंगे, आनंदा हिंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गावाच्या विकासासाठी वाद नव्हे तर सामोपचार गरजेचा आहे. हिंगेवाठार रस्ता प्रकरण त्याचे उत्तम उदाहरण आहे,”
– तहसीलदार राजेंद्र नजन