वाई प्रतिनिधी: सुशील कांबळे
वाई : गावात राहणाऱ्या लोकांनी जंगलांवर आक्रमण केले. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी मानवी वस्तीत आले. त्यांच्या परिक्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा आपल्याला अधिकार नाही. वन्यजीव वाचले तर मानव वाचेल, त्यामुळे वन्यजीव संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे.असे प्रतिपादन वाईच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मा. स्नेहल मगर यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व वनपरिक्षेत्र वाई यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी डॉ. प्रशांत सूर्यवंशी एन.एस.एस. चे सल्लागार प्रो.डॉ. सुनील सावंत, कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट यांची उपस्थिती होती.
मा. मगर म्हणाल्या, आपण एखादा जीव वाचवला तर आपल्या जीवाला कसलीही बाधा येत नाही, हा निसर्ग नियम आहे. मानवानेही निसर्गाचा नियम पाळायला हवा. ध्वनी, हवा, पाणी यांचे प्रदुषण थांबवायला हवे. मानवी जीवन वाचण्यासाठी वन्यजीव संरक्षण अत्यंत आवश्यक आहे.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, आपण सर्वांनी खारुताईचा आदर्श घ्यायला पाहिजे. फळे खाल्ल्यानंतर उर्वरित फळे ती जमिनीत पुरून ठेवते. त्यामुळे वृक्ष लागवड होते. वणवे लावल्यामुळे वणव्यामध्ये वनसंपत्ती भस्मसात होते. हे सारे थांबवणे मानवाच्या हातामध्ये आहे. वेगवेगळ्या स्लाईडच्या माध्यमातून त्यांनी वनस्पती, वृक्ष, प्राणी, पशु-पक्षी यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे म्हणाले, अन्नसाखळीतील प्रत्येक प्राणी महत्त्वपूर्ण आहे. ही साखळी अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. ह्या साखळीशिवाय सजीव सृष्टी टिकू शकत नाही. मानवप्राणी सोडलातर निसर्गातील प्रत्येक प्राणी निसर्गाला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेतो.
कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अंबादास सकट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कु. सिध्दी गायकवाड हिने सूत्रसंचालन केले. कु. भूमिका धनावडे हिने आभार मानले.
त्यानंतर स्वयंसेवकांनी हातात फलक घेऊन घोषणा देत वन्यजीव संरक्षण साठी रॅली काढली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ लिपिक जितेंद्र चव्हाण, व्ही. एम. चौरे, एस. आर. मोरे, हरीबा शिंदे, मोहन शिंदे, दादा जानकर, सुमितकुमार चौगुले, डॉ. अमोल कवडे यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक-स्वयंसेविका, डॉ. बाळकृष्ण मागाडे, सुरज यादव, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती .