राज्यात २८८ विधानसभा मतदार संघापैकी एक मतदार संघ म्हणजे पुरंदर हवेली मतदार संघ. पुंरदर आणि हवेली हे दोन भाग या मतदार संघात मोडतात. या दोन्ही गोष्टींना जोडणारा दुवा म्हणजे दिवे घाट. घाटच्या वर पुरंदर तर घाटच्या खाली हवेली, असं साध सोपं करुन सांगता येईल. या मतदार संघात ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही मतदार आहेत. यावर थोडक्यात सांगायचं झाल्यास ग्रामीण भागातील प्रश्न आणि शहरी भागातील समस्या याच मिश्रण म्हणून पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघाकडे पाहिलं जातं. विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकतं. यामुळे येथील इच्छुक उमेदवारांनी मतदार संघावर दावा करीत प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात केलेली आहे. इच्छुकांच्या भावूगर्दीत संधी कोणाला मिळणार हा सध्याचा प्रश्ना आहे.
….त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलली
राज्यातील राजकीय समीकरणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बदलली तशी ती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील बदलेली आहेत. या गोष्टीचा विचार करता राज्यातील विधासभा मतदार संघावर दावा सांगणाऱ्यांची संख्या देखील वाढली असल्याचे चित्र आपल्याला पाहिला मिळत आहे. या मतदार संघाचे सध्याचे विद्यामन आमदार काँग्रेसचे संजय जगताप हे आहेत. मंत्री राहिलेल्या विजय शिवतारे यांचा पराभव करीत जगताप यांनी विजयाचा गुलाल आपल्या नावे केला. मुख्यत्वे जगताप विरुद्ध शिवतारे असे त्यावेळी निवडणुकीकडे पाहिले गेले. सध्याचे चित्र हे फार वेगळे आणि सर्वांना अचंबित करणारे आहे. या दोन्ही संभाव्य उमेदवारांबरोबर अनेक जण मतदार संघावर दावा सांगत आमदारकीच्या मैदानात उतरायला तयार झाले आहेत.
अनेकांकडून प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात
महायुतीमधून माजी मंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, मा. आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे ही नावे इच्छुकांची आहेत, असे सूत्रांनी सांगितले. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधून सध्याचे आमदार संजय जगताप( काँग्रेस) आणि मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवार असल्याचे सांगण्यात आले आहे. झेंडे यांनी त्या दृष्टीने खूप आधीपासून मतदार संघ पिंजून काढत प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात केलेली आहे. प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची नावाची शिफारस कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गोटातून मिळाली आहे. दुर्गाडे यांचे आमदार उल्लेख असलेले बॅनर तालुक्यात ठिकठिकाणी पाहिला मिळत आहे.
संधी कोणाला मिळणार?
सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यमान आमदार संजय जगताप यांनाच पुन्हा निवडून द्या, अशा प्रकारचे आशय सांगणारे अनेक पोस्ट व्हिडिओ कार्यकर्ते व्हायरल करीत आहेत. मा. मंत्री विजय शिवतारे हे देखील तालुक्यातील गावांना भेटी देत गावभेट दौरा करीत आहेत. तसेच शासनाच्या योजनांची माहिती त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंडवरील पोस्टच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फिऱ्या झडत आहेत. असे असताना तालुक्यातील अनेक प्रश्नांची सोडणूक आजही झालेली नाही. हे मोठे दुर्देव आहे. येणाऱ्या निवडणुकीला घेऊन येथील नागरिकांच्या संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया आहेत. ही निवडणूक सोपी नाही. अनेकांकडून दावा मतदारसंघावर सांगण्यात आला असला तरी संधी कोणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
…पण प्रश्न आजही प्रलंबित
गुंजवणी पाण्याचा प्रश्न, पुरंदर उपसा सिंचन हे दोन प्रमुख प्रश्न पुरंदर तालुक्यातील नागरिकांचे आहेत. याशिवाय अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ज्याची सोडवणूक झालेली नाही. निवडणूक आली की या दोन प्रश्नांवर अनेकांकडून भाषणबाजी केली जाते. पुरंदर तालुक्याला नैसर्गिकाचे खूप मोठे वरदान लाभलेले आहे. दिवे घाट पार केल्यानंतर हडपसर पर्यंत अरूंद रस्ता असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक व या रस्त्याने प्रवास करणारे हैराण झाले आहेत. असे एक ना अनेक प्रश्न गेल्या अनेक काळापासून प्रलंबित आहेत.