पुणेः शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर असलेल्या खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर लायटरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत वाकड पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीस असलेले पोलीस अंमलदार आणि हातगाडीवर काम करणारा चालक हे दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत नीलेश सुभाष दरेकर असे जखमी अंमलदाराचे नाव असून हातगाडी चालक संतोष सोनवणे हा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पोलीस अंमलदार यांना गुरुवारी (दि. १२) शिवाजीनगर येथे कोर्ट कर्तव्य होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते चहा पिण्यासाठी न्यायालया समोरील असलेल्या एका हातगाडीजवळ गेले. त्यावेळी अचानक लायटरचा मोठा स्फोट झाला. या घटनेत दरेकर यांचे दोन्ही हात आणि चेहऱ्याला भाजले आहे. तर हात गाडी चालकाचे केस जळाले असून चेहरा आणि कान भाजला आहे.
अनेक हातगाड्यांना परवाना नाही
शिवाजीनगर परिसरात असलेल्या जिल्हा सत्र न्यायालयात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ नेहमीच असते. न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांच्या हातगाड्या लावल्या जात आहेत. यातील अनेक हातगाड्या या बेकायदा लावल्या जात असल्याची माहिती मिळली आहे. न्यायालयाची दुपारी २ ते ३ या वेळेत जेवणाची सुट्टी असते. न्यायालयात कामा निमित्ताने तसेच तारखेला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यातील अनेकजण या वेळेत येथील हात गाड्यांवरील विविध खाद्यपदार्थ, वडापाव खाण्यासाठी, चहा किंवा जेवणासाठी येत असतात.
अन्…अशी घडली घटना
ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी न्यायालयाच्या क्रमांक तीनच्या बाहेर गेटवर वडापावची ही हातगाडी आहे. या गाडीवर शंभरहून अधिक नागरिकांची गर्दी असते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारात पोलीस कर्मचारी दरेकर हे वडापाव खाण्याकरिता या हातगाडीवर आले होते. यावेळी हातगाडीवर ठेवलेल्या गॅस शेगडीजवळ ते उभे होते. कढईत तापलेले तेल यामुळे सिगारेट पेटवण्यासाठी लावलेला लायटर गरम झाला आणि आगीचा मोठा भडका होऊन स्फोट झाला. लायरमध्ये भरण्यासाठी आणलेले लिक्वीडदेखिल गॅस शेगडीच्या जवळच ठेवण्यात आले होते. त्या गरमीमुळे त्याचा अचानक स्पोट झाला.